मुंबई – सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीकास्त्र डागल्याचे पाहायला मिळत आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत म्हणाले, आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या राजकारणात एका संस्कृतीचे पालन केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्या टोळीला हाताशी धरुण दळभद्री राजकारण सुरु केले. त्यामुळे आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीसांकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले. आता संजय राऊतांच्या या टीकेला फडणवीस काय पलटवार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.