कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींपेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे. मात्र केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बनवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजित पवारांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली.
नाट्यगृह दिमाखात उभे करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार – अजित पवार
कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ‘केशवराव भोसले नाट्यगृहाला’ लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ इतर पदाधिकारी व माझे सहकारी यांच्यासह आज मी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. मी कोल्हापूरकरांना सांगू इच्छितो, हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न मी करेन ! असे आश्वसन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर वासियांना केली आहे.
कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच 'केशवराव भोसले नाट्यगृहाला' लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 11, 2024
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. हसन मुश्रीफजी, इतर पदाधिकारी व माझे सहकारी… pic.twitter.com/QpIRiMUR7w
नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले की, केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा 5 कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला.