नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशाची राजधानी दिल्ली येथील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याची स्थिती आहे. बदलत्या हवामानामुळे लोकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हंगामी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवण्यासोबतच श्वसन आणि ऍलर्जीच्या आजारांच्या तक्रारी घेऊन बहुतांश रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्वात मोठी समस्या सिगारेट आणि विडी ओढणाऱ्या लोकांमध्ये वाढली आहे. ज्यांना आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये सामान्य दिवशी सुमारे 7 हजार रुग्ण ओपीडीत येतात, मात्र या दिवसांत ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
आजकाल पूर्व दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात खोकला, सर्दी आणि ऍलर्जीने ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिस्थिती अशी आहे की, रांगेत उभा असलेला प्रत्येक रुग्ण मास्क घातलेला दिसतो. रुग्णालयात तैनात असलेल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पुनीता सांगतात की, प्रदूषणामुळे क्षयरोग झालेल्या रुग्णांच्या त्रासात तर वाढ झाली आहे.
तसेच क्षयरोगातून बरे झालेले रुग्णही श्वास घेण्यास त्रास आणि छातीत जड झाल्याच्या तक्रारी करत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध आणि तरुणांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. आजकाल ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या सुमारे 20% वाढली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.