इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथे आत्मदहन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी आज (मंगळवार) पहाटे इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये इचलकरंजीचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे प्रमुख दीपक पाटील, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार नगरपालिकेचे माजी सभापती मारुती पाथरवट, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दत्त संगेवार, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिसाळ, ठेकेदार कर्मचारी अमर लाखे यांचा समावेश आहे.
या सर्वांवर भादवि ३०६ ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली.
दरम्यान, आत्महत्या करणारे कार्यकर्ते नरेश मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी काल मध्यरात्री नातेवाइकांनी नगरपालिकेत भोरे यांचे पार्थिव ठेवून आंदोलन केले. कारवाई होत नाही, तोवर मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पहाटे नातेवाइकांनी पार्थिव नगरपालिकेकडून हलवले.