कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरमधील घडलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय समिती उद्या (बुधवार) सकाळी प्रत्यक्ष पहाणी करून चौकशी करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.माळी यांनी दिली. तर गुरुवारी या चौकशी संदर्भात चौकशी समितीची बैठक बोलावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सीपीआरमध्ये सोमवारी पहाटे ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून आग लागली. तात्काळ तेथील वार्डात उपचार घेणाऱ्या १५ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर त्यातील तीघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी डॉ. बी.वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ११ वा. चौकशी समिती प्रत्यक्ष पहाणी करणार आहेत.

त्यांच्याबरोबर तांत्रिक परिक्षणासाठी इलेक्ट्रीक इंजिनिअर आणि बायोइंजिनिअर असणार आहेत. तर गुरुवारी समितीची दुर्घटनेच्या चौकशी संदर्भात बैठक होणार आहे. या मध्ये पुढील दिशा ठरणार असून त्यानंतर चौकशी अहवाल सादर होणार आहे. त्या अनुषंगाने बैठीकीचे पत्रे समिती सदस्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.