शिंगणापूर (प्रतिनिधी) : शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेमध्ये एका वादग्रस्त क्रीडा शिक्षकाने स्वतःचीच अकॅडमी सुरू केल्याचा प्रकार एक महिन्यापूर्वी ‘लाईव्ह मराठी’ने उघडकीस आणला होता. लाईव्ह मराठीच्या बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मुख्याध्यापकांकडे या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. दरम्यान, तो वादग्रस्त शिक्षक क्रीडा प्रशालेमध्ये नव्हताच असा अहवाल मुख्याध्यापकांनी दिल्याचे सभापती प्रवीण यादव यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्याध्यापकांनी असा अहवाल दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून मुख्याध्यापकांचा शिक्षकाला वाचवायचा प्रयत्न आहे हे यातून स्पष्ट होत आहे. या शिक्षकाला विद्यार्थीनींना मुलींना बेदम मारहाण करणे आणि इतर कारणास्तव या आधीही दोनवेळा सक्तीच्या रजेवर पाठविले होते. या शिक्षकाने लॉकडाउनच्या कालावधीतच जिल्हा परिषदेच्या प्रशालेमध्ये स्वतःची क्रीडा अकॅडमी सुरू केली होती. बाजूलाच कोरोनासेंटर असणाऱ्या या प्रशालेमध्ये खाजगी प्रशिक्षण सुरू करणारा हा शिक्षक अनेक कारणास्तव नेहमी चर्चेत असतो.

तसेच शाळेतील मुलांशी भेदभाव करणे, जातीवाचक बोलणे असे अनेक प्रकार या शिक्षकाने केलेले असले तरी कोणीही पालक या शिक्षकांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेचा पगार घेणाऱ्या या शिक्षकाने कोरोना काळात राज्यात सगळीकडे क्रिडाप्रशिक्षण बंद असताना बाहेरच्या जिल्ह्यातील मुलींना आणून त्यांना शुल्क आकारत कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रशिक्षण चालू केले होते.

तर शिक्षकाने खाजगी अकॅडमीसाठी जिल्हा परिषदेच्याच शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे लाईट आणि पाणी, जि.प. चे दोन शासकीय निवासस्थाने वापरली आहेत. या वादग्रस्त क्रीडा शिक्षकावर कारवाई करण्यात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग एवढी उदासीनता का दाखवत आहे ? हे प्रकरण मॅनेज झाले की काय ? की कुठला राजकीय दबाव आला आहे का ? असा सवाल आता जोर धरु लागला आहे.