कळे (प्रतिनिधी) : आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र जि.प.माजी.अध्यक्ष राहूल पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला आहे. नुकताच त्यांनी धामणी खोऱ्यातील पन्हाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन कार्यकर्ते, नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

मोरेवाडी, पणोरे, बळपवाडी, आकुर्डे, निवाचीवाडी दरम्यानच्या सर्व गावांना राहूल पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन कार्यकर्ते, नागरिक, शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या प्रचाराला त्यानी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.

स्वर्गीय आ.पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर राहूल पाटील राजकीय वारसदार म्हणून पुढे आले आहेत. या संपर्क दौऱ्यात धामणी खोऱ्यातील जनतेने त्यांचे गावोगावी विशेष स्वागत तसेच सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय पी.एन.पाटील यांच्या आठवणीने अनेक कार्यकर्ते गहिरवले. दौऱ्यात राहूल पाटील यांनी धामणीखोऱ्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांची माहिती ग्रामस्थांकडून घेतली.

दरम्यान, राहूल पाटील यांनी, हा संपर्क दौरा कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला नाही. पी.एन.पाटील यांचे निधन झाल्यानंतर समस्त जनतेने आम्हा कुटुंबियांना धीर देण्याचे काम केले आहे. त्यांचेच आभार मानण्यासाठी मी जनतेच्या दारात जात असल्याचे स्पष्ट केले.