कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे रणांगण सुरू आहे. एका पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करण्याचे सूत्र अजूनही कायम आहे. अशातच आता, कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला असल्यानं कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार पडलं आहे.

कोल्हापूर उत्तर मधून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव हे आमदार झाले होते. 2021 मध्ये चंद्रकांत जाधवांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानं 2022 साली लागलेल्या पोट निवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असता त्या निवडून आल्या.

आ. जयश्री जाधव यांनी पुन्हा कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर आपला दावा सांगितला होता. मात्र, काँग्रेसने कोल्हापूर उत्तर साठी मधुरी महाराज यांची निवड केल्यानं आ. जयश्री जाधव नाराज झाल्या असल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.