कपिलेश्वर ( प्रतिनिधी ) : स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या जयंतीनिमित्त राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेचे आयोजन केले जाते. आज, शनिवारी या सराव चाचणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार जयंत आसगावकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आ. जयंत आसगावकर म्हणाले, स्व. विजयसिंह मोरेंच्या जयंतीनिमित्त संस्थेच्यावतीने दरवर्षी चांगला उपक्रम घेतला जातो. या सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागणार आहे. एनएमएमएस, सारथीसारख्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी या माध्यमातून होणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, आदर्शवत शिक्षित पिढी घडावी, हीच भूमिका राहिली. त्यांची ही परंपरा आज मोरे कुटुंबीयांनी पुढे सुरु ठेवली आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे नेते आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने बिद्री साखर कारखाने संचालक राजेंद्र मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी जोतीराम पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, सरपंच रणधीरसिंह मोरे, प्राचार्य विक्रमसिंह मोरे, के. के. पाटील, उदय पाटील, पी. एल. पाटील, नामदेव रेप, बी. एस. पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते.