कळे (प्रतिनिधी) – धामणी परिसरात ग्रामदेवतांच्या मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील धामणी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार दि. 3 रोजी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवदेवतांची आभूषणे, अलंकार, दैनंदिन पोशाख वस्त्रे, देवाची पालखी, पूजेच्या वस्तू, मंदिराची स्वच्छता, दुरुस्ती, रंगरंगोटी आदी, कामाची लगबग सुरू आहे.
परिसरातील प्रत्येक गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिरात प्रत्येक घरातील एक सदस्य नऊ दिवस देवाचा उपवास करून मंदिरात वास्तव्यास असतात. नवरात्रोत्सव काळात मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक विधी, कार्यक्रम होतात. ग्रामदेवतांची विविध रूपात नऊ दिवस पूजा बांधण्यात येते.
सध्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करून रंगरंगोटीची कामे जोरात सुरू आहेत. मंदिरावरती विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर प्रकाशमय केला जातो. या कामासाठी पुजारी, गुरव समाज, गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग असतो. गावातील प्रत्येक कुटुंब घराची स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर नदीकाठच्या घाटावरती घरोघरी अंथरुण धुण्यासाठी गर्दी होत आहे.