कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला वीज पुरवठा करणारे 33/11 केव्ही दुधाळी हे उपकेंद्र आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास महावितरणच्या या उपकेंद्राला सर्वप्रथम फटका बसतो. पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेता कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वनिल काटकर यांनी या उपकेंद्राची पाहणी केली. तसेच काटकर यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास शहरातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
33/11 केव्ही दुधाळी उपकेंद्रामधून शहराच्या विविध भागांत वीज पुरवठा करणारे गंगावेश फिडर, शुक्रवार गेट फिडर, मिराबाग फिडर, मस्कुती फिडर साकोली फिडर, महाद्वार फिडर, लक्षतीर्थ फिडर, स्टेशन ट्रान्सफॉर्मर फिडर हे 11 केव्हीचे आठ फिडर निघतात. सन 2019 व 2021 मध्ये पूराचे पाणी दुधाळी उपकेंद्रामध्ये आल्याने या आठही फिडरवरील वीज ग्राहकांचा पुरवठा बाधित झाला होता. या उपकेंद्रावर सुमारे २३ हजार घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहक आहेत. पूर परिस्थितीत यातील सुमारे २० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पर्यायी यंत्रणेद्वारे (बॅक फीडिंग) सुरु करण्यात येतो. तर सुमारे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येतो.
सतत पडणारा पाऊस आणि पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेता मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी शहरास पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्याच्या यंत्रणेची माहिती घेऊन ही यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
यावेळी कोल्हापूर मंडलाचे अधिक्षक अभियंता गणपत लटपटे, कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता देवदास कोरडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, सहाय्यक अभियंता संजय सानप, इंद्रजित कांबळे, दुधाळी उपकेंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.