मुंबई (प्रतिनिधी) : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना यांनाछत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीतील आहे.

हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर शके 1740 नंतर लिहिलेली आहे. या बखरीत छत्रपती शिवरायांची संपूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ यामध्ये नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मारले ? त्यावेळी कोण कोण लोक हजर होते ? याचाही तपशील या बखरीत आहे.

इतिहास संशोधक गुरुप्रसाद हे मूळचे कोल्हापुराचे असून ते शुक्रवार पेठेत राहायचे. मात्र, नोकरीनिमित्त मागील काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. तर मनोज हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतात. या दोघांनाही इतिहास संशोधन लेखनाची प्रचंड आवड आहे. हे दोघेही जवळपास 6 महिन्यांपूर्वी फ्रान्समधील बीएनएफ येथील हस्तलिखित स्वरुपातील जुनी कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी या दोघांना मोडी लिपीतील काही कागदपत्रं दिसून आली. त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर असल्याचं लक्षात आलं.

फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे शके 1740 नंतर लिहिली गेली असावी असा अंदाज आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत ‘राजश्री राघो मुकुंद’ यांची असे असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज असल्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे.