मुंबई : रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत
काय म्हणाले छगन भुजबळ…?
छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हादेखील मी शांत बसतो. मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे आहे. मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.
पण आता मी निवडणूक लढलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी जवा काढला. मी त्यांना काय सांगू? मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत, अशा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला.आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे..