कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना शाळेत बुद्धिबळ हा महत्त्वकांक्षी उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा नव्या जोमाने सुरु करत आहे. त्यासाठी आवश्यक ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प महाराष्ट्रात पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नागपूर, जळगाव, नांदेड आणि रायगड या आठ जिल्ह्यात आयोजित केला आहे. त्यापैकी पहिला कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेला ट्रेन द ट्रेनर्स कॅम्प आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या शिबिरासाठी विवेकानंद कॉलेजचे आणि संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सन्मानित ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या संकल्पनेतून जागतिक बुद्धिबळ संघटनेचा (फिडे ) “चेस इन स्कूल” 2014 पासून भारतात प्रथम महाराष्ट्रात सुरू झाला. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन यांनी या उपक्रमासाठी जैन इरिगेशनची स्पॉन्सरशिप दिली आहे.
उपाध्यक्ष आणि चेस इन स्कूल कमिटीचे चेअरमन गिरीश चितळे, डॉक्टर शरद बनसोडे, सिद्धांत शिंदे आणि विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते बुद्धिबळाच्या चुंबकीय प्रदर्शन पटावर चाल करून ट्रेन द ट्रेनर्स कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. विकास जाधव, संतोष कुंडले, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव आणि चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव आणि प्रशिक्षक मनिष मारुलकर, मुख्य प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, उपाध्यक्ष धीरज वैद्य आणि राष्ट्रीय पंच आरती मोदी उपस्थित होते.