मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. अशातच आता जनगणने संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 ला जनगणना होणार आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जनगणना 2025 पासून सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. तर ही जनगणना 2026 पर्यंत चालणार आहे. यापूर्वीच म्हणजेच 2021 मध्येच जनगणना होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे त्यावेळी जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता देशात पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
पुढच्या वर्षापासून म्हणजेच 2025 पासून जनगणना केली जाणार असून आता जनगणनेचे चक्र देखील बदलले जाणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना ही केली जात होती. मात्र आता यापुढे 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशा दहावर्षांनी केली जाणार आहे.
केंद्र सरकारनं अद्याप निर्णय घेतला नाही :
अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणी होत आहे, मात्र सरकारनं अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कर्नाटकात, लिंगायत, जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये वाल्मिकी, रविदासी, असे विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मिळत आहे.