कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला जाईल. त्याचप्रमाणे टाकाळयावरील छत्रपती शाहू जलतरण तलाव लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ते कोल्हापुरातील राजारामपुरी एक्सटेंशनमध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांची त्यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली त्यावेळी बोलत होते.

खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून राजारामपूरी एक्सटेन्शनमध्ये २० लाख रूपये निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, माजी महापौर दीपक जाधव, मुरलीधर जाधव, हेमंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला.

खा. महाडिक यांनी, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा १०० मीटरचा रस्ता बनवला जाणार आहे. सिमेंटचा मजबुत रस्ता बनवला जाणार असल्याने, हा रस्ते खड्डेमुक्त होवून, नागरिकांची सोय होईल, या रस्त्याबरोबरच राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील सर्व रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील. त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांची तरतुद करत आहे. टाकाळयावरील बंद असलेला जलतरण तलाव पुन्हा लवकरच सुरू केला जाईल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील अनेक समस्या आपण सोडवत असून, या मतदार संघात नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे माजी आमदार अमल महाडीक यांनी सांगितले.

यावेळी नरेंद्र मांगलेकर, करण जाधव, हरिष टिंडवाली, अभिजीत शिंदे, रविंद्र मुतगी, शिवशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.