कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्याने राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन घोषीत केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.

विकेंड लॉकडाऊनचे पोलीस प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, २५ स्टाइकिंग फोर्स, १५०० पोलीस, ५०० होमगार्ड, राज्य राखीव दलाची दोन पथके असा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांसह एकूण १२५ पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत.   तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावर बॅरिकेडस् लावून वाहनांची तपासणी होणार आहे. तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरूजी वसाहत, आर. के. नगर आदी ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांनाच प्रवास करता येणार आहे.

तर कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह करवीर तालुका, जयसिंगपूर, हातकणंगले, वडगाव, मलकापूर याठिकाणी पोलीस दलाचे विशेष लक्ष असणार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून  सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात पेट्रोल पंप, दवाखाने, मेडिकलसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.