कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील, सत्यजीत पाटील- सरूडकर, गणपतराव पाटील आणि राजेश लाटकर यांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर आज रविवारी सदिच्छा भेट घेतली. या सर्वांना मोठ्या मताधिक्यांने निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
गेली काही दिवसापासून, महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा सुरू होती. या सर्व घडामोडी मध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे देखील सहभागी होते. अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले असून, या आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत पाटील- सरूडकर, काँग्रेसचे शिरोळ मधील उमेदवार गणपतराव पाटील आणि उत्तर कोल्हापूरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पार पडलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात या सर्वांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
यावेळी अनेक राजकीय मुद्द्यावरही चर्चा होऊन, मतदार संघात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी, काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, उद्योगपती आनंद माने, माजी महापौर भीमराव पोवार, आदी उपस्थित होते.