कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने 2019 मध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही भरती प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यामध्ये 85 हजार 567 उमेदवारांना परतावा थेट बँक खात्यावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेतील कॉग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषद भरतीसाठी परीक्षा शुल्कापोटी बेरोजगार उमेदवारांकडून 33 कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यापैकी केवळ 21 कोटी रुपये परत केले जाणार आहेत हे खरे आहे का ? 13 लाख उमेदवारांपैकी किती उमेदवारांना आतापर्यंत परतावा देण्यात आला आहे ? उर्वरित उमेदवारांना किती कालावधीत त्यांची रक्कम परत मिळणार आहे? याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही सुरु आहे असे सवाल आमदार सतेज पाटील यांनी केले होते.

या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 अन्वये मार्च 2019 व ऑगस्ट 2021 मध्ये होणारी पदभरती प्रकिया रद्द करण्यात आली असून सदर परिक्षांकरीता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.