कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेतक-यांना आता केवळ एक रूपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ सुरु केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत यंदाचा खरीप हंगाम सन 2023 – 24 पासून आणि आगामी रब्बी हंगामातील 2025 – 26 मधील अधिसूचित पिकासाठी ही सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे आणि आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
रब्बी हंगाम 2024 मध्ये या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत रब्बी ज्वारी पिकासाठी दिनांक 30 नोव्हेंबर, हरभरा आणि गहू पिकासाठी 15 डिसेंबर 2024 आणि उन्हाळी भुईमुग पिकासाठी 31 मार्च 2025 या प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. या पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
सद्या ही योजना केवळ अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्व शेत-यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतक-यांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकासाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी गहू (बागायत), ज्वारी (जिरायत) हरभरा आणि उन्हाळी हंगामासाठी उन्हाळी भुईमुग ही पीके अधिसुचित करण्यात आली आहेत. शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतक-यांनी आणि बिगर कर्जदार शेतक-यांनी स्वतः त्यांचे विमा प्रस्ताव ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2024 तसेच गहू आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2024 पूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. (उन्हाळी भुईमुगासाठी दि. 31 मार्च 2025)
विमा कंपनी विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. मुंबई, या कंपनीची निवड करण्यात आली आहे. शेतक-यांच्या तक्रार निवारणासाठी कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002660700 असा आहे.
पिकनिहाय विमा हप्ता / जोखिम स्तर/संरक्षित रक्कम –
गहू (बा.)पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 38 हजार रुपये, विमा हप्ता दर (टक्के) शेतकरी हिस्सा 2.50 , विमा हप्ता दर 950 रुपये/हेक्टर,
रब्बी ज्वारी (जि.) पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 31 हजार रुपये, विमा हप्ता दर (टक्के) शेतकरी हिस्सा 2.50 , विमा हप्ता दर 775 रुपये/हेक्टर,
हरभरा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा हप्ता दर (टक्के) शेतकरी हिस्सा 5, विमा हप्ता दर 1 हजार 750 रुपये/हेक्टर,
उन्हाळी भुईमुग पीकासाठी विमा संरक्षित रक्कम 42 हजार 971 रुपये, विमा हप्ता दर (टक्के) शेतकरी हिस्सा 4 , विमा हप्ता दर 1 हजार 718.84 रुपये/हेक्टर असे असून शेतकऱ्यांनी प्रति अर्ज 1 रुपया भरुन विमा काढायचा आहे.
रब्बी हंगाम 2024-25 पीक विम्यासाठी पिकनिहाय अधिसूचित मंडळ-
रब्बी ज्वारीसाठी शिरोळ तालुक्यातील फक्त शिरोळ व नृसिंहवाडी (2 महसूल मंडळ)
गहू (बा.) साठी हातकणगंले (8 पैकी 7 मंडळ (इचलकरंजी वगळून), शिरोळ (7/7 मंडळ), करवीर(11 पैकी 10 मंडळ करवीर वगळून) गडहिंग्लज (7/7 मंडळ) एकूण 31 महसूल मंडळ
हरभरा पीकासाठी हातकणंगले, करवीर, कागल शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा (एकूण 9 तालुके)
उन्हाळी भुईमुगसाठी पन्हाळा, गगनबावडा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड (6 तालुके) याप्रमाणे आहे.
खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये सोयाबीन भुईमुग, खरीप ज्वारी, भात नाचणी या पिकासाठी 86 हजार 654 शेतक-यांनी 23 हजार 307 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग घेतला आहे. नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपनीकडून सुरु झाली आहे.
रब्बी हंगाम पिक विमा योजनेसंबंधी अधिक माहीतीसाठी शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक, सर्व सुविधा केंद्र (सी एस सी केंद्र) किंवा संबंधित राष्ट्रीयकृत बँक, वित्तीय संस्थेशी किंवा तालुकास्तरावरील विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधवा आणि योजनेत जास्तीतजास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पांगरे यांनी केले आहे.