मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधीच अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवली असून त्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब आज दुपारी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.
‘या’ नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे हजेरी…
सागर बंगल्यावर आ. प्रकाश सोलंकी, आ. राहुल आवाडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दाखल झाले आहेत. तर शिवसेनेचे आ. संजय राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर, काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर दाखल झाले होते. मात्र, शिवसेनेच्या यादीत यावर्षी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेसेनेकडून नारळ देण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठांकडून दिली जात आहे.
महायुती सरकारचा उद्या होणारा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांच्याकडील काही मंत्रीपदे रिक्त ठेवू शकणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. कारण की, दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त आहे. उद्या संध्याकाळी मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर पार पडण्याची शक्यता आहे कारण, मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढी सक्षम जागा नाही.