बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 500 पेक्षा अधिक गावात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बुलढाणा शहराला बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. मात्र सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.
महिलांची पाण्यासाठी मैलो दूर वणवण
सिंदखेड राजा तालुक्यातील सिंधी या गावात नेहमीच पाणीटंचाई भासत असते. शासनाने या गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर केली. कंत्राटदाराने गावामध्ये विहिरी बांधल्या परंतु पाईप लाईन टाकलीच नाही आणि कंत्राटदार पूर्ण कामाचं बिल घेऊन निघून गेलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडल्याने या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलो दूर चालत जाऊन पाणी आणायला जावं लागत.
जलजीवन मिशन योजनेची प्रतीक्षाच
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील चुरमुरा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सटवा बन्सी राठोड नावाच्या व्यक्तीने गावकऱ्यांसमोर गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायती समोर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. दोन वर्षांपासून गावकरी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. चुरमुरा हे गाव घनदाट जंगलामध्ये वसलेले गाव असून या गावात दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपसरपंच याना एका खोलीत डांबून ठेवून ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.