कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : परदेश दौऱ्यावर असलेल्या केडीसीसीच्या संचालक मंडळांनी इटलीमध्ये व्हेनिस शहरात स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्तब्धता पाळून त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखातून कुटुंबीयांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती मिळावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले, माझे सच्चे आणि परममित्र माननीय आमदार श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनाची बातमी आम्हाला परदेशामध्ये कळाली आणि मला तर धक्काच बसला. गेल्या रविवारी (दि. १९) ते बाथरूममध्ये पडले होते. त्यानंतर कोल्हापुरातील ॲस्टर आधार या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर गेले चार दिवस मी त्यांना अधिकच्या उपचारासाठी मुंबई किंवा परदेशात हलविण्याच्यासंदर्भात दररोज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी आणि त्यांच्या जवळच्या संबंधित व्यक्तींशी विचारपूस करीत होतो. त्यादृष्टीने हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती. त्यामुळे, आम्हा सर्वांनाच वाटत होते की ते एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाणार नाहीत. परंतु; शेवटी काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आम्हा सर्वांना ते सोडून गेले.

कै. श्री. पी. एन. पाटील हे माझे सच्चे स्नेही होते. संपूर्ण हयातवर ते काँग्रेसच्या विचारांचा पाईक म्हणून काँग्रेसशी निष्ठावंत राहिले. मी तर कधी -कधी त्यांना विनोदाने म्हणायचा, “एखाद्यावेळी जग इकडचे तिकडे होईल. परंतु; आमदार पी. एन. पाटील संपूर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षाचीच पाठराखण करतील”.

अशा एका ध्येयवेड्या, संपूर्ण आयुष्यभर तत्वांशी इमानदार रहाणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. एखादा निर्णय एकदा घेतला की त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही. तो निर्णय निभावणारा असा एक सच्चा मित्र आज आमच्यातून निघून गेला. ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. १९८४-८५ साली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात आमचा दोघांचाही संचालक म्हणून एकत्र प्रवेश झाला. त्यावेळीपासून आजतागायत म्हणजे गेली ४० वर्षे आमची मैत्री अतूट राहिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार, समाजकारण आणि राजकारणामध्ये आम्ही अनेकवेळा एकत्र होतो. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधातही होतो. परंतु; त्याचा कधीही आणि कोणताही परिणाम आमच्या मैत्रीवर पडला नाही.

उद्याच आम्ही परदेशातून निघून त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देऊन दिलासा देणार आहोत. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातून सावरण्याची हिंमत आणि शक्ती परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना………!

यावेळी केडीसीसी बँकेचे बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक. तसेच; गोकुळचे संचालक युवराज पाटील व बँकेचे माजी संचालक असिफ फरास उपस्थित होते.