निपाणी (प्रतिनिधी) : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर आहे, यावेळी मुश्रीफांनी अशी भावना व्यक्त केली. निपाणी येथे आयोजित बोधपीठ मेळावा आणि गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तभक्त दत्तामामा बर्गे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

या मेळाव्यात गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष दत्तामामा बर्गे यांना हसन मुश्रीफ आणि श्री.पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज डॅा.संजयपंत महाराज -बाळेकुंद्रीकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सीमा भागासह सेनापती कापशी खोऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येने जमले होते.

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की,धार्मिक आणि सांप्रदायिक चळवळीला पाठबळ देताना 750 हून अधिक मंदिरांची उभारणी करू शकलो, हे माझे भाग्य आहे. यामध्ये विशेषता; सीमाभागासह सेनापती कापशी खोऱ्यात श्री दत्त महाराज यांची मंदिरे मोठ्या संख्येने उभारली याचा मला विशेष आनंद आहे. श्री. पंत महाराज यांच्या या बोधपीठाच्या चळवळीमध्ये लोकही मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने सहभागी होतात, ही आनंद आणि समाधानाची बाब आहे असेही ते यावेळी म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्री.दत्तामामा बर्गे म्हणाले, बोधपिठाच्या वतीने मिळालेल्या या जीवन गौरव पुरस्कारामुळे माझे आयुष्य सार्थक झाल्याची भावना आहे.नम्रता अंगी बाळगत 10 तत्त्वांचा आयुष्यभर स्वीकार करा.तुम्हाला समाजाकडून उदंड प्रेम मिळेल. श्री.पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज डॅा संजयपंत कुलकर्णी महाराज म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध देवदेवतांची मंदिरे उभारून धार्मिक आणि सांप्रदायिक चळवळीला बळ दिले आहे.त्यांच्या या पुण्याईच्या जीवित कार्यामुळे श्री.पंत महाराज बाळेकुंद्री यांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.