कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर हातकणंगलेत नाराजी नाट्य सुरु झाले. एकीकडे महायुतीच्या नेत्यांनी मानेंविरोधात उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. भाजप नेत्यांनी तर उमेदवार बदला असा सल्ला पक्षाला दिला होता. तर दुसरीकडे महायुती सोबत असलेले इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांनी उघड नाराजी व्यक्त करत निवडणूक लढण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. अखेर आज आमदार प्रकाश आवडे यांनी हातकणंगले लोकसभेसाठी स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत महायुतीसह धैर्यशील माने यांना मोठा धक्का दिला. पण प्रकाश आवाडे यांनी महायुतीविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचे धाडस केलेच कसे? असा प्रश्न कोल्हापुरातील युतीच्या नेत्यांना पडला असून आवाडेंना उमेदवारी जाहीर करण्याइतपत बळ भाजप नेत्यांनीच दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा महायुतीने मैदानात उतरविले आहे. खरे तर अगोदर त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे कारण पुढे करीत भाजपने उमेदवारीला विरोध केला होता. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगलेत विद्यमान खासदारांनाच उमेदवारी जाहीर केली. यामुळे हातकणंगलेत माने यांच्याविरोधात नाराजी वाढत चाललेली असताना यातच हातकणंगले लोकसभेसाठी आमदार आवाडे यांनी स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का दिला. तर आवाडे यांनी घेतलेल्या भूमिकेला भाजपनेच बळ दिल्याचे माने समर्थक आणि शिवसैनिक बोलत आहेत. त्यामुळे भाजप नेते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

धैर्यशील माने यांना उमेदवारी अन् आवाडे नाराज
धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आवाडे गट आक्रमक झाला होता. माने हे इचलकरंजी दौऱ्यावर गेले असता त्यांना त्याची प्रचिती आली होती. विशेष म्हणजे तेथील भाजप कार्यालयात गेल्यावर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना माने यांना करावा लागला होता. तसेच भाजपने केलेल्या सर्वेतही खासदार माने यांच्याविषयी नाराजी असल्याचे समोर आले होते. यानंतर भाजपकडून धैर्यशील माने यांची उमेदवारी बदला असा दबाव मुख्यमंत्र्यांवर टाकला जात होता. पण माने यांना उमेदवारीचा शद्ब दिल्याने शिंदे माने यांच्या उमेदवारीवर ठाम राहिलेत. पण भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम होती.

त्यामुळे एकीकडे आवाडे नाराज असताना दुसरीकडे भाजप नेते संजय पाटील यांनीही धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. दरम्यान, धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या आवाडे यांनी बंडखोरीची तयारी केली असल्याचे बोलले जात असताना आज प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत स्वतःची उमेदवारी जाहीर करून धैर्यशील माने यांच्यासमोर संकट उभं केलं आहे. त्यामुळे माने काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आवाडेंच्या उमेदवारीला कुणाचे बळ?
दरम्यान, हातकणंगले लोकसभेसाठी आमदार आवाडे यांनी स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे ते यावेळी म्हणाले. तर एकीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर केलेला असतानाही दुसरीकडे प्रकाश आवाडे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचे धाडस केलेच कसे? असा प्रश्न पडला असून प्रकाश आवाडेंना बंडाची भूमिका घेण्यासाठी भाजप नेत्यांनी पाठबळ दिल्याची चर्चा हातकणंगले मतदारसंघात सुरु आहे. तर आवाडेंच्या उमेदवारीला कुणाचे बळ मिळाले आहे, हे लवकरच समोर येईल, अशा प्रतिक्रिया माने समर्थकांमधून येत आहेत.