मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते हे मविआ सोबत असणाऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे. कुथे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

आज शुक्रवारी (ता. 26 जुलै) गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे. कुथे यांनी हाती शिवबंधन बांधताच भाजपावर जोरदार टीकास्त्र डागले. पक्ष प्रवेशानंतर कुथे म्हणाले की, भाजपने मला बेवकूफ बनवले, फेब्रुवारी 2024 मध्ये बावनकुळे नागपूरला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील, त्याने आपल्याला फरक पडत नाही, त्याच दिवशी कळले की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवले, असे टीकास्त्र माजी आमदार रमेश कुथेंनी डागले.

मी फक्त शिकायला गेलो होतो
दरम्यान, रमेश कुथे यांचा पक्षप्रवेश होताना उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला. मी शिवबंधन बांधतो, पण परत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर?, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, मी पक्षासोबतच होतो, फक्त तिकडे शिकायला गेलो होतो, असे उत्तर रमेश कुथे यांनी दिले.

विदर्भात शिवसेना ठाकरे गट सक्रीय
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी, विदर्भात शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनेल, असे भाकीतही त्यांनी केलं होतं. त्यामुळे, विदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, आजच्या माजी आमदार रमेश कुथे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद विदर्भात वाढली आहे