कोल्हापूर : देशात भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार केंद्रात स्थापन झाले आहे. नरेंद्र मडी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. तर खासदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळही संपलेला आहे. त्यामुळे आता भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याजागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर एनडीए सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता भाजपकडून नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यांच्याजागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये एखाद्या स्तरावर एखादी गोष्ट ठरते त्याची माहिती शेजारच्या मुंगीलाही लागत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय, याची चर्चा आता सुरु झाली आहे. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विनोद तावडे हे कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जिथ पाठवू त्याठिकाण यश कसे मिळेल, यादृष्टीने सगळे बारकावे ते पाहतात. 1995 ला चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर ते भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेले, आता ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. आज भाजप पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना काय द्यायचं आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. भाजपमध्ये खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तर ते मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या 2024 च्या निवडणुकीत थेट नऊपर्यंत खाली घसरली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. भाजप पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांनी थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.