जळगाव : जागावाटपाचा विचार करता महायुतीनं यावेळी मतदारसंघातला उमेदवार बदलला आहे. घोषणा होईपर्यंत उन्मेष पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार असा विश्वास सगळ्यांना होता. पण भाजप नेतृत्वानं जळगाव मतदारसंघातून ऐनवेळी स्मिता वाघ यांची उमेदवारी घोषित केली.
गेल्या काही वर्षांतील राजकीय समीकरणांनं युतीचं समीकरण बदललेलं असलं तरी या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं हा जिल्हा यावेळी नेमका कुणाच्या बाजूनं उभा राहतो. कोणत्या शिवसेनेची शक्ती अधिक ठरते यावर सगळी समीकरणं अवलंबून असणार आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं राहणार असल्याचं समजतंय.राष्ट्रवादी काँग्रेसकडं तसा ताकदीचा उमेदवार नसल्याचं कारण यासाठी दिलं जात आहे.तिकिट कापल्यानं नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्या नाराजीचा फायदा घेत उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या पत्नीलाच रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही मतदारसंघात सुरु झाली आहे.त्यामुळं उमेदवारीचं हे गणित स्पष्ट झाल्यानंतर याठिकाणी होणाऱ्या लढतीचं चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.