टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथे जोतिबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नारायण टेक दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी ठेकेदाराने रस्त्यावर मधोमध खडीचे टाकलेल्या ढिगाऱ्यावरून पडून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल (बुधवार) रात्री उशिरा घडली आहे.
या रस्त्यावर खड्डेच खड्डे असून याच्या दुरुस्तीचे काम आजच सुरू झाले आहे. या कामासाठी ठेकेदाराने रस्त्यात टाकलेल्या खडीचे ढीग लक्षात न आल्याने अंधारात औद्योगिक वसाहतीत कारखान्यामध्ये कामावर जाणारे कामगार मोटारसायकल घसरून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तिघे किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर ठेकेदाराच्या विरोधात ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, स्थानिकांनी खडीचे ढीग जेसीबीच्या साह्याने हटविले आहेत.