कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात आरक्षणाने मोठा ट्विस्ट आणला आहे. नगराध्यक्ष पद ‘महिला सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळेच शहरातील एका प्रभावी माजी नगरसेवकाने आपल्या पत्नीला नगराध्यक्ष बनवण्यासाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधल्याची अत्यंत खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

महिला सर्वसाधारण आरक्षणाचा घेतला ‘राजकीय’ फायदा…

नगराध्यक्ष पद ‘महिला सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी निश्चित झाल्यामुळे, आता नगराध्यक्षपदाची सूत्रे कोणा सर्वसाधारण महिलेच्या हातात जातात याकडे शहराचे लक्ष लागले आहे. याच संधीचा अचूक फायदा घेत, संबंधित माजी नगरसेवकाने शहरातील काही महत्त्वाच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी उभी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याची सर्व यंत्रणा आता ‘सौ. नगराध्यक्षा’ या एकाच ध्येयाने गतिमान झाली असून, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांची पत्नी प्रमुख दावेदार म्हणून उतरण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गणितामध्ये मोठी अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे बोलले जातं आहे.

महाआघाड्यांकडून सर्वे टीम दाखल…

‘तिकिटा’ची चुरस वाढली दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपल्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत, पण अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. दोन्ही आघाड्यांनी शहरात सर्वे करण्यासाठी खास टीम दाखल केल्या असून, या सर्वेक्षणाच्या आधारावरच नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, तिकीट कोणाला मिळणार यावरून दोन्ही छावण्यांमध्ये जोरदार चुरस (टक्कर) दिसत आहे.

विधान परिषदेमुळे स्थानिक निवडणुकीला धार….

आगामी काळात होणारी विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच दोन्ही प्रमुख आघाड्या नगरपालिका निवडणुकीत सावध पाऊल टाकत आहेत. स्थानिक निवडणुकीतील यश-अपयश थेट विधान परिषदेवर परिणाम करू शकते. त्यामुळेच या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारीतील विलंब, आणि इच्छुकांची मोठी संख्या यामुळे निर्माण झालेली नाराजी तिसऱ्या आघाडीच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कुरुंदवाडच्या राजकारणात ‘महिला सर्वसाधारण’ पदावर कोण बाजी मारणार, याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.