कुरुंदवाड प्रतिनिधी (कुलदीप कुंभार) : कुरुंदवाडच्या राजकीय वर्तुळात सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी एक मोठा ‘राजकीय स्फोट’ झाला आहे! आतापर्यंत महाविकास आघाडी आणि शाहू आघाडी यांच्यात थेट लढत होणार, असे मानले जात असताना, माजी नगरसेवक जवाहर पाटील यांनी तिसऱ्या आघाडीचा बिगुल फुंकत नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी त्रिशला पाटील यांच्या प्रचाराचा धडाक्यात नारळ फोडून शुभारंभ केला आहे. या एकाच निर्णयाने कुरुंदवाडमधील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली असून, नगराध्यक्षपदाची निवडणूक आता सरळ द्विरंगी न राहता, निश्चितपणे त्रिकोणी लढतीत रूपांतरित झाली आहे.
राजकारणाला मिळाली ‘कलाटणी’!
गेले काही दिवस कुरुंदवाडमध्ये एका तिसऱ्या राजकीय आघाडीची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, आज जवाहर पाटील यांनी थेट आपल्या पत्नी सौ. त्रिशला पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पाटील यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडी आणि शाहू आघाडीसाठी थेट ‘धक्का’ मानला जात आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस चे विजय पाटील यांच्या पत्नी योगिनी पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे, तर शाहू आघाडीकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सून मनीषा डांगे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांनी मतदारांशी संपर्क आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे.
त्रिशला पाटलांच्या एन्ट्रीने खळबळ
एकीकडे महाविकास आघाडी आणि शाहू आघाडीने आपापली मोर्चेबांधणी पूर्ण केली असताना, जवाहर पाटील यांच्या पत्नी त्रिशला पाटील यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली आहे. आजपासून (सोमवार, १० नोव्हेंबर) त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होताच राजकीय वातावरणात कमालीची खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक असलेले जवाहर पाटील यांची स्वतःची ताकद आणि राजकीय अनुभव मोठा आहे. त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे दोन्ही प्रमुख आघाड्यांना आता आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागणार आहेत. कुरुंदवाडमध्ये आता महाविकास आघाडी, शाहू आघाडी आणि जवाहर पाटील प्रणित तिसरी आघाडी अशा तिघांमध्ये नगराध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीची ‘त्रिशूल टक्कर’ होणार हे निश्चित झाले आहे! या तिसऱ्या आघाडीमुळे कुणाचे मताधिक्य घटणार आणि कोणाला फायदा होणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
