पेठवडगाव ( प्रतिनिधी ) : पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर ताकदीने लढविणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात रंग घेत होत्या. सर्वसामान्य वडगावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही अशीच मागणी असल्याचे चित्र तयार झाले होते.
भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून आतापर्यंत या मुद्द्यावर अधिकृत बोलणे झाले नव्हते. मात्र आता या मागणीला अखेर मान्यता मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आली आहे.
दरम्यान, स्वबळाचा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळत असतानाच, विरोधकांनी उपरोधिक टीका सुरू केली आहे. “भाजपकडे आपल्या मुद्द्यांवर मतदारांना आकर्षित करण्याची आत्मविश्वासाची चाचणी आहे, त्यामुळेच स्वबळाचा पर्याय ते तपासत आहेत,” असा सूर विरोधकांकडून दिसून येतो. मात्र भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे भिन्न आहे. “संघटना सक्षम आहे, वडगावातील मतदारांचा थेट विश्वास पक्षावर आहे,” अशी टिप्पणी काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळते. दरम्यान वडगावमध्ये सध्या यादव आघाडी कडून विद्याताई पोळ या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत तर युवकक्रांती आघाडी कडून श्रीमती प्रविता सालपे या उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पण मागील पंचवार्षिक चे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. युवकक्रांती आघाडी व भाजप महायुती यांच्यात सौख्य असल्याचे सर्वश्रुत आहे. पण भाजप च्या या रणनीतीने कोणाला फायदा होणार ? यामुळे युवकक्रांती आघाडी ला बळ मिळून यादव आघाडी मागे पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
