कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं असून, विधानसभेच्या अनुशंगाने राजकीय पक्षांनी हालचाली ही सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून झाडाझडती करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माजी आमदार के. पी. पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने ही तपासणी केली आहे. 21 जून रोजी रात्री अचानक पथकाने रात्रभर तपासणी केली. ही तपासणी प्रकल्पात असलेल्या त्रुटींबाबत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आल्याची ही चर्चा आहे.

के. पीं. ना मविआच्या वाटेवरुन वळवण्यासाठी ही चाल ?

माजी आमदार के. पी. पाटील गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसत असून. ते महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात ही झळकू लागले आहेत. यातच पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

याबाबत के. पी. पाटील यांनी कोणतीही भुमिका स्पष्ट केली नसली तरी याबाबत चर्चा आहे. त्यामुळे पाटील यांना मविआच्या वाटेवरुन वळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही चाल आहे का ? असा ही सवाल आता दबक्या आवाजात विचारला जावू लागला आहे.