दिल्ली : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलीय. मागील काही दिवस बायडन यांच्या उमेदवारीवरुन अमेरिकेत त्यांना पक्षांतर्गंत विरोध होत होता. जो बायडन पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक होते पंरतु जो बायडन यांना पक्षातून विरोध होत होता. मात्र आता ऐनवेळी बायडेन यांनी माघार घेतल्याने राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे.

जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मघार घेतलीय. तर अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतल्याचे जो बायडेन यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, डेमोक्रॅटस पक्षाने जो बायडन यांच्या उमेदवारीवर अपसंती दाखवली होती. अशातच आता खुद्द जो बायडन यांनी अमेरिकेतील नागरिकांना चिठ्ठी लिहीत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.

कमला हॅरिस यांना पाठिंबा
कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली तर या निवडणुकीत त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळू शकणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यान बायडेन यांना आपली भूमिका ठामपणे मांडता आली नव्हती. त्यानंतर बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू असताना, कमला हॅरिस यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होते. कमला हॅरिस डेमोक्रॅट पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार बनल्या आणि जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील. मात्र तरीही पहिल्या महिला उपराष्ट्रपती होण्याचा मान त्यांच्याचकडे आहे.

जो बायडन काय म्हणालेत ?
जगात बळकट अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. मागील साडे तीन वर्षाच्या कालावधीत आम्ही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेला आणखी विकसित करण्यासाठी देशात मोठ्या गुंतवणूकही आणल्या आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे काही धाडसी निर्णय आम्ही संसदेत घेतले. पुढे बायडन अमेरिकेतील जनतेला संबोधून म्हणाले, तुमच्या शिवाय वैश्विक महामारी आणि आर्थिक संकटातून आपण अमेरिकाला बाहेर काढू शकलो नसतो. राष्ट्रध्यक्ष म्हणून देशाची सेवा करणे माझे मोठे भाग्य होते. पक्षाच्या आणि देशाच्या हिताचा विचार करुन मी निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णय घेत आहे अशी घोषणा जो बायडन यांनी पत्रातून केली आहे.

पुढे पत्रात जो बायडन यांनी कमला हॅरिस यांचे आभार सुद्धा मानले आहेत. कमला हॅरिस जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये उपराष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर पुढे जो बायडन यांनी ट्वीट करत आणखी एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे, कमला हॅरिस याना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करणं हा माझा आजवरचा सर्वात योग्य निर्णय ठरला. आता पक्षाने त्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी द्यावी यासाठी जो बायडन यांचे समर्थन असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विरुद्ध ट्रम्प अशी लढत होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्याने अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अधिक रंजक बनली आहे. बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर या पदासाठी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांना पाठिंबा असेल असेही ते म्हणाले आहेत. जो बायडेन यांनी सोशल मिडिया पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझ्या डेमोक्रॅट मित्रांनो, मी उमेदवारी न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय कमला हॅरिस यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचा होता आणि मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय होता. आज मी कमला हॅरिस यांना आमच्या पक्षाचा उमेदवार बनवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा देत आहे. डेमोक्रॅट – आता एकत्र येण्याची आणि ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे, असे बायडेन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.