कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद ग्रामीण विकास मंडळ, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये दिला जाणारा अण्णाभाऊ साठे स्मृति सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्रकाश भोसले लिखित ‘बापाचं काळीज’ कथासंग्रहास जाहीर झाला. 

प्रकाश भोसले यांचा बापाचं काळीज हा ग्रामीण भाषेतील कथासंग्रह असून या कथासंग्रहाने गावगाड्याचे अंतरंग, गावगाड्यातील माणसं, त्यांचे व्यवहार, घटना उलगडून दाखवण्याचं काम केलं आहे. कथा वाचताना रंगराव बापू पाटील, शंकर खंडू पाटील, वामन होवाळ या लेखकांच्या कथांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कथांमधून चित्रदर्शीपणा, ओघवती भाषाशैली, अस्तंगत होत निघालेले ग्रामीण शब्द, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी अनुभवायला येतात. 

तुटपुंज्या शेतीत राबून दारिद्र्याने पिचलेल्या तरीही मुलाबाळांच्या पोषणासाठी आणि शिक्षणासाठी परिस्थितीशी अविरत झुंज देणाऱ्या प्रत्येक आई बापाचा सन्मान करणारा हा कथासंग्रह या पुरस्काराने खऱ्या अर्थाने  सर्वोत्कृष्ट ठरला अशी प्रतिक्रिया लेखक प्रकाश भोसले यांनी दिली. या निमित्ताने त्यांनी मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील आणि साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांचे आभार मानले. सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील लेखक प्रकाश भोसले हे जिल्हा परिषदेच्या ( कोदवडे ता.पन्हाळा )  येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. आजवर त्यांच्या अनेक कथा, कविता, लेख प्रसिद्ध झाले आहेत. मार्मिक आणि आशयपूर्ण लेखन हा त्यांच्या लेखनाचा प्रांत आहे.