कोल्हापूर – सलग दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाखालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात येणार आहे. आज (25 जुलै) सायंकाळी चार चाकी वाहने थांबवण्यात येणार असून संध्याकाळी लहान वाहने पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत.
पुढील काही दिवसांच्या हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवित हानी थांबविण्यासाठी बालिंगामधील जुन्या दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2 चे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी दिली आहे.
पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा उदा. रुग्णवाहिका, दुधाच्या गाड्या, भाजीपाला वाहतुक सुरु राहील. स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.