कोल्हापूर  (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिंगणापूर फाटा येथे  लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असलेले देशी दारू दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना करवीर पोलीसांनी आज अटक केली आहे. अरुण शंकर मेहतर (वय ५०) आणि सतीश बाळासो शिंदे (वय २७) दोघेही (रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी मधुकर मारुती पाटील (रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी,  कोल्हापुरातील शनिवार पेठेतील मधुकर पाटील यांचे शिंगणापूर फाटा येथे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हे दुकान बंद होते. दरम्यान ३१ मार्च रोजी दोघा चोरट्यांनी हे दारूचे दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मधुकर पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आज चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अरुण मेहतर आणि सतीश शिंदे या दोघांना अटक केली.