मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभा 2024 चा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा 4 पैकी 1 जागेवर उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीला विधानसभेत यश मिळवून देण्यासाठी तटकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करणार असून ते आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा आजपासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती.

लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.

आजपासून दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घेणार आहेत.