कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व नृत्य कलाकारांचे संघटन करणे, त्यांच्या समस्यांसाठी कार्य करणे या हेतूने महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद राज्यभर कार्य करत आहे. नृत्य साधकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्या क्षेत्रातील अडचणी दूर व्हाव्यात व त्यांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी ही परिषद कार्य करते. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध विश्व विक्रमी नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांच्या ३४ वर्षातील नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना समितीने पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

बगाडे यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील नृत्य कलाकारांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडवणे, नृत्य परिषदेचे विविध उपक्रम तळागाळातील नर्तकापर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या पदाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या नृत्यक्षेत्रात आणि एक मानाचा तुरा समाविष्ठ झाला आहे. राज्य नृत्य परिषदेच्या वतीने जतीन पांडे, आशुतोष राठोड आणि रत्नाकर शेळके यांचे हस्ते, जिल्ह्यातील प्रमुख नृत्य दिग्दर्शकांचे उपस्थितीत सागर बगाडे यांना या पदाची धुरा सोपविण्यात आली.