मुंबई : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस असेपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांती मिळणार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल, असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण याला खूप मोठी परंपरा आहे. मराठी माणसं नाटकांवर आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्याचप्रमाणे आपले जे नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणायचं की विष्णुचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्यामुळे विष्णुदास त्यांची नाट्यकला समोर आली आहे. अभिनय, कला, दिग्दर्शन, नेपथ्य हे पण बाहेर येईल. असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला. तसंच एकनाथ शिंदे मौलवीचा वेश धारण करुन दिल्लीत गेले होते, आधी अहमद पटेलांना भेटायला गेले. त्यानंतर अमित शाह यांना भेटले. असं त्यांचेच लोक सांगत आहेत.” असं संजय राऊत म्हणाले.

तसेच मनोज जरांगे पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे गृहस्थ आहेत. ते अजून राजकारणात आले नाहीत. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे प्रश्न आम्हालाही माहित आहेत असे राऊत म्हणाले. या देशात लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो. म्हणून जरांगे पाटील यांनी काही भूमिका घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात, भारतीय राज्यघटनेने त्यांना अधिकार दिल्याचे संजय राऊत म्हणाले.

पुढे म्हणाले, “छगन भुजबळ बेळगावात सीमा प्रश्नाचा लढा दिला त्यासाठी वेशांतर केलं होतं. ते वेशांतर लोकांना आवडलं होतं. त्यांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या होत्या. अशा प्रकारे राष्ट्रासाठी भूमिका वठवल्या आहेत. मात्र या ज्या भूमिका समोर येत आहेत त्या काही बऱ्या नाहीत. हरुन अल रशिदची पोरं आहेत ही सगळी. तो वेशांतरं करुन फिरायचा. मी जी मागणी केली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात आहे? याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे त्यावर काय कारवाई होणार? हा माझा सवाल आहे” असं संजय राऊत म्हणाले.