कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) :- शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे येत्या 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शहरातील नांदणी नाका येथे आगमन होणार आहे. या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील जनतेने पुतळ्याचे जंगी स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. पुतळा आगमन समारंभाची नियोजन बैठक आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या ठिकाणची सर्व कामे बहुतशिकरित्या पूर्ण झाले आहे. याच ठिकाणी शिवकालीन साहित्याचे संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारले जाणार आहे. सध्या या कामांना वेग आला असून, अश्वारूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुतळ्याचे शहरात आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे व पारंपारिक वाद्याचा वापर केला जाणार आहे.
यड्रावकर चेंबर्स येथे झालेल्या बैठकीत यासंबंधी नियोजन केले. या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस माजी नगराध्यक्ष असलम फरास यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरवणुकीच्या मार्गक्रमणाचे नियोजन सांगितले. मिरवणुकीसाठी शहराच्या प्रमुख मार्गांचा वापर होईल, असे त्यांनी सांगितले. मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत शितल गतारे, संभाजी मोरे, विठ्ठल मोरे, रमेश यळगुडकर, अर्जुन देशमुख, रमेश शिंदे, मिलिंद भिडे, रणजीत महाडिक, यांच्यासह सर्व समाजातील मान्यवर उपस्थित होते.