कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाचा नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाही श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत, भाविकांसाठी एलईडी स्क्रीनवर दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर नवरात्री आलीय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पध्दतीने होणार. यानिमित्ताने आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत बैठक झाली.
यावेळी महेश जाधव म्हणाले की, लोकसहभागाशिवाय यंदा हा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात येणार. उत्सव काळात मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे मंदिरातील धार्मिक विधी पार पडले जाणार आहेत. मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
या बैठकीला देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, एन. डी. जाधव, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक वसंत बाबर, राजारामपुरी पोलीस निरीक्षक सिताराम डुबल,महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी योगेश पाटील,महापालिका पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रयाभरे,महापालिका फायर अधिकारी तानाजी कवाळे, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या जयश्री पाटील उपस्थित होते.