मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कायद्यानुसार सर्व कामे केली जातात. त्यामुळे आमच्याकडून काही चुकले असेल, तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावरही अन्याय करत नाहीत, असे स्पष्ट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यानंतर तपासातून हाती लागलेल्या पुराव्यांनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल तर ती योग्यच आहे. त्यामुळे या गोष्टींशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्या देशात प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आहे. इतके स्वातंत्र्य दुसरे कुठेही नाही. उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते. मात्र, त्याबद्दल कोणीही ब्र शब्दसुध्दा काढत नाही, असेही राऊत म्हणाले.