कोल्हापूर (प्रतिनिधी) : टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभागामार्फत थेट मुलाखतीव्दारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्वावर) करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो आणि अन्य संबंधित दस्तावेजासह प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर येथे 10 जानेवारी 2025 पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपलाव्दारे जमा करावेत, असे अवाहन कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
पात्रतेच्या अटी :-
टपाल जीवन विमाकरिता उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पुर्ण असावे कमाल वयाची कोणतीही अट नाही. उमेदवार 10 वी पास, मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. बेरोजगार तरुण, तरुणी, स्वयं रोजगार करणारे पुरुष आणि महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्राम पंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन, प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. या बाबत अधिक माहिती प्रशिक्षणा दरम्यान दिली जाईल. थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणुन निवड झालेल्या उमेदवरांना राष्ट्रपती यांचे नावे तारण असलेले 5 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र किंवा किसान विकास पत्र सुरक्षा ठेव म्हणुन या कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.
थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर डाक विभागीय कार्यालयामार्फत प्रशिक्षण दिले जाईल. सर्व उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच परवाना दिले जाईल. विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबतचे आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग ,कोल्हापूर यांचेकडे राखीव आहेत. अर्ज छाननी नंतर वरील अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी नजिकच्या सब पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.