सांगली : सांगली जिल्ह्यातून मिरजसहित पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणून सांगली जिल्ह्यातील वसंतदादांच्या विचाराच्या नेत्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं आहे,असा निर्धार सांगलीतील  नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल पाटील बोलत होते. पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले दबाव झुगारला आणि मिरजकर जनतेने मलाच मतदान केले, असे विधान नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केले. यावेळी निवडणूक काळातील किस्से विशाल पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मिरज विधानसभा मतदार संघातून मोठं मताधिक्य मला देण्याते आले. मात्र पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले, दबाव झुगारला आणि जनतेने मलाच मतदान केले. मिरजकर जनतेने विधानसभेला तीन वेळेला बाहेरच्या व्यक्तीला निवडून दिले मात्र हाच बाहेरचा व्यक्ती घरातल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सांगू लागला होता. मात्र त्यांचे जनतेने आजिबात ऐकलेले नाही.