मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांमध्ये महायुतीला घवघववीत यश मिळाले. महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीने ईव्हिएम मशीनवर शंका घेतली असून त्यावर ते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता, नाना पटोले यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली पहायला मिळत आहे.

नाना पटोले काय म्हणाले..?

पटोले म्हणाले की, भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका असल्याने हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’ घडणारा प्रकार निषेधार्ह असल्याचा हल्लाबोलही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. त्याबरोबर, आपण दिलेल्या मतावर दरोडा टाकल्याची शंका जनतेच्याही मनात आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ असंही नाना पटोले म्हणाले.