सातारा (प्रतिनिधी) : कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे शहराला सास्कृंतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वाईचा उल्लेख महाभारतातही आढळतो. तर, भारतात दक्षिण काशी म्हणूनही वाई प्रसिद्ध आहे. याच वाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. साताऱ्यातील वाई तालुक्यातील किकली गावातील पुरातन भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे संशोधन करण्यात आले आहे.
प्राचीन खेळ संवर्धन मोहीमेतंर्गत संपूर्ण राज्यभर ऐतिहासिक प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध आणि संवर्धनाचे कार्य सुरू आहे. अनेक जिल्ह्यांनंतर आता सातारा जिल्ह्यात असे प्राचीन पटखेळांचे अवशेष शोधण्यात यश आले आहे. साताऱ्यातील वाई तालुक्यातील किकली गावातील पुरातन भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे संशोधन झाले असून या खेळांचे दस्तावेजीकरण आणि नोंदही झाली आहे
किकली गावात असणारे प्राचीन ‘भैरवनाथ मंदिर’ हे इसवी सनाच्या १२-१४ व्या शतकातील असून ‘यादवकालीन’ स्थापत्याचे आणि ‘भूमिज’ मंदिरशैलीचे ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे. भैरवनाथ मंदिरात एकूण सात पटखेळांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. यात नवकंकरी, वाघ-बकरी, पंचखेलिया आणि अष्टचल्लस या प्राचीन बैठ्या खेळांचा समावेश आहे.
यामध्ये प्राचीन इजिप्त, रोम, नेपाळ तसेच श्रीलंके सारख्या ठिकाणी या खेळांचे उगम व संदर्भ सापडताना दिसतात. या सर्व ठिकाणी आपला समृध्द प्राचीन व्यापार चालत असे आणि त्यामुळेचं विविध प्रांतातले हे खेळ इथे कोरून ठेवल्याचे दिसते. म्हणूनचं कराडसह वाईचा भाग हा सुमारे 2 हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता याला दुजोरा देणारे हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे.