मुंबई : मुंबईतील कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू ओढावला. अतिशय भीषण अशा या अपघातात काही कळायच्या आतच परिस्थिती इतकी बिघडली, की निष्पापांवर काळानं घाला घातला. याच भीषण अपघातातली भीषण दृश्य आता समोर येण्यास सुरुवात झाली असून, घटनास्थळी बसच्या चाकाखाली माणुसकीसुद्धा चिरडली आणि तिचा अंत झाला. हेच सांगणारा एक व्हिडीओ नव्यानं समोर आला आहे. जिथं, अपघातात मरण पावलेल्या महिलेचे दागिने चोरीला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे..
मुंबईसह संपूर्ण राज्याला हादरवणारा हा अपघात कसा झाला, का झाला, चूक कोणाची होती या प्रश्नांची उत्तर तर तपासातून मिळतीलच. पण याचदरम्यान एक माणुसकीला काळिमा फासणारी घटनाही त्या अपघाताच्या ठिकाणी निघाली. बस अपघातानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावले खरे पण तेथेच गाडीखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या एक महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. त्या मृत महिलेचा गाडीखाली चेंदामेंदा झालेला असतानाच तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचे उघड झाले आहे. या अतिशय खालच्या थराच्या, माणूसकीला लाजवणारी ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असन त्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यामुळे आपण माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नीस अन्सारी ( वय 55) असे त्या महिलेचे नाव असून कुर्ला बेस्ट अपघातात गाडीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढायचा सोडून कोणीतरी त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याच काढून घेतल्या. मोबाईलमध्ये हा प्रकार कैद झाला असून दोन अनोळखी इसम बसखाली निपचित पडलेल्या कन्नीस यांच्या हातातून बांगड्या काढून घेत असल्याचे त्यात दिसत आहे. समोर पडलेली महिला मेली आहे, कोणाचा तरी जीव गेलाय हे पाहूनही त्यांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. उलट ते तिथे बसून त्या महिलेच्या हातातील बांगड्या काढून घेण्यासाठी झटापट करत होते. निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा नराधम आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.