कोल्हापूर (प्रतिनिधी) : रस्त्यावरून चालत जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करत, मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने तिचा विनयभंग केला. याप्रकाराने घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला. त्यामुळे याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्या मद्यपी तरुणाची चांगलीच धुलाई केली. स्वप्नील रामचंद्र घोडके (वय ३०, रा. शेणगाव, ता. भुदरगड) असे मद्यपी तरुणाचे नाव आहे. तो मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दुपारच्या सुमारास एक तरुणी व्हिनस चौक ते दाभोळकर कॉर्नर या मार्गावरून चालत घराकडे जात होती. ती शाहूपुरी पोलीस स्टेशन जवळ आली असता मोटारसायकलवरून पाठलाग करत आलेल्या स्वप्नील घोडके याने त्या तरुणीला थांबवत अश्लील वर्तन केले. त्यावेळी तरुणीने विरोध केला. मात्र, पुन्हा घोडके याने तरुणीला अडवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने आरडाओरडा केला.

त्यामुळे येथे जमलेल्या परिसरातील नागरिकांनी स्वप्नील घोडके याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत घोडके गंभीर जखमी झाला. यावेळी शाहुपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी घोडकेला नागरिकांच्या तावडीतून सोडवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील घोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घोडके याच्यावर उपचार सुरू असल्याने अटक करण्यात आलेली नाही.