पुणे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ‘गोकुळ शक्ती’ या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी आ. सतेज पाटील म्हणाले की, गोकुळने नेहमीच गुणवत्तेच्या जोरावरती अनेक उद्दिष्ट पार केली आहेत. गोकुळच्या दुधाची व उपपदार्थांच्या विक्रीमध्ये पुणे आणि परिसरातील वितरक यांच्या सहकार्यामुळे व त्यांच्या मेहनतीमुळे वाढ झाली आहे, भविष्यात ही वाढ अधिक व्हावी यासाठी वितरकांनी प्रयत्न करावेत. हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवावा. तसेच गोकुळचे नवीन प्रतीचे ‘गोकुळ शक्ती’ दूध हे निश्चित पुणे येथील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल व बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, हे टोण्ड दूध पाश्चराईज्ड, होमोजिनाईज्ड बरोबरच व्हिटॅमीन ‘ए’ आणि ‘डी’ ने फोर्टीफाईल केले असलेने याचे शेल्फ लाईफ वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे. सध्या गोकुळची दररोज १४ लाख लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असल्याचे सांगितले.
यावेळी संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.